coronavirus : प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणीत मोठा निर्णय; जिल्ह्याच्या सीमा झाल्या बाहेरच्यांना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 04:46 PM2020-03-23T16:46:38+5:302020-03-23T16:49:20+5:30
आता बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना परभणी जिल्ह्यात प्रवेश बंदी
परभणी: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी काढला आहे. त्यामुळे आता बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना परभणी जिल्ह्यात प्रवेश बंदी झाली आहे.
कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव राज्यात वाढत आहे. पुणे आणि मुंबई या महानगरांमध्ये परभणी जिल्ह्यातून हजारो कामगार कामाच्या निमित्ताने गेले होते. हे कामगार आता जिल्ह्यात परतले आहेत. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सीमा बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्याच प्रमाणे १४४ कलमही जिल्ह्यात लागू केले आहेत. या कलमांतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सीमाबंदीचा महत्वपूर्ण निर्णय २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील सर्व सीमा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्याचे नागरिक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई व इतर महानगरांतून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे सर्व आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार असून या आदशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये अपराधास शिक्षेस पात्र ठरविले जाईल, असेही या आदेशात नमूद केले आहे.