coronavirus : परभणीत दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 07:25 PM2020-07-13T19:25:02+5:302020-07-13T19:34:01+5:30
परभणी आणि पाथरी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
परभणी: शहरातील जुना पेडगावरोड भागातील एका ४५ वर्षीय कोरोना रुग्णाचा सोमवारी सकाळी ७.३० वाजता आणि जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाथरी येथील ६८ वर्षीय वृद्धाचा सायंकाळी ५.३० वाजता मृत्यू झाला. पाथरी येथील रुग्णाचा मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण मृत्यूची संख्या ८ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता निर्माण झाली असतानाच सोमवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. पाथरी शहरातील ६८ वर्षीय रुग्ण फुफ्फुसाचा आजार असल्याने ११ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा स्वॅब घेतला. मात्र या स्वॅबचा अहवाल प्रलंबित होता. या रुग्णावर उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा स्वॅब अहवाल प्राप्त झाला असून, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
त्यापूर्वी सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास परभणी शहरातील जुना पेडगावरोड भागातील एका ४५ वर्षीय कोरोना रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. या रुग्णास कर्करोग होता. त्यामुळे पूर्वीपासूनच तो कर्करोगाचे उपचार घेत होता, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. १३ जुलै रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनामुळे दोन रुग्णांचे मृत्यू झाले असून, जिल्ह्यात आता कोरोनाचे ८ बळी झाले आहेत.
सोमवारी १५ रुग्णांची भर
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात पंधरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक आठ, परभणी शहरात पाच, जिल्हा कारागृह येथील एक आणि पाथरी तालुक्यात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७६ झाली आहे.