Coronavirus : आनंददायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला गोंडस पुत्राला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:09 PM2020-07-29T17:09:21+5:302020-07-29T17:10:00+5:30
मातेसह पुत्राची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गंगाखेड : कोरोना पॉझिटिव्ह २७ वर्षीय महिलेने कोरोना रुग्णालयात उपचार घेतांना बुधवारी (दि. २९) दुपारी दोन वाजता गोंडस पुत्राला जन्म दिला. मातेसह पुत्राची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाधिताच्या संपर्कात आल्याने शहरातील हटकर गल्ली परिसरातील २७ वर्षीय गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर २१ जुलै पासून कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळपासूनच महिलेस प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. याची माहिती कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांना दिली.
यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे, डॉ. वसीम खान, परिचारिका माला घोबाळे, नंदाताई शाहू, आशा मुंडे, श्रीमती कोल्हे यांनी कोविड रुग्णालयातच प्रसूतीची तयारी केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. नवजात बाळ व माता दोघांची प्रकृती उत्तम व ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.