CoronaVirus : राहणे आणि जेवणाची चिंता; रेल्वेरुळाच्या मार्गाने आग्र्याकडे निघाले १४ मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:31 PM2020-04-01T19:31:40+5:302020-04-01T19:34:22+5:30
परभणीत बांधकाम मजूर म्हणून होते कामाला
सेलू:- परभणीहून रेल्वे पटरी मार्गाने उतर प्रदेशातील आग्रा येथे पायी निघालेल्या १४ मजुरांना सेलू पोलीसांनी रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी दुपारी ४ वाजता ताब्यात घेतले. त्यांना शहरातील एका वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.
परभणी शहरात सेंट्रिंगचे काम करणारे उतर प्रदेशातील फरिदाबाद येथील १४ कामगार अडकून पडले होते. १७ मार्च रोजी ते कामासाठी परभणी शहरात आले होते. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून २० मार्च रोजी देशभरात लाॅकडाऊन झाल्या नंतर या कामगारांना हाताला काम मिळाले नाही. राहण्यासाठी घर आणि अन्नाची सोय नाही. रेल्वे आणि बस वाहतूक ही बंद झाल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे रेल्वे पटरी मार्गाने उतरप्रदेशातील आग्रा येथे जाणा-या साठी हे कामगार बुधवारी सकाळीच परभणीहून पायपीट करत निघाले.
सेलू तालुक्यातील डिग्रस जहागिर शिवारातील पटरी शेजारी शेत असलेल्या काही शेतक-यांनी त्यांना पाहिले. पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर ते कामगार पुन्हा पटरीने सेलू कडे निघाले. त्याच वेळी शेतक-यांनी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना माहिती दिली. कामगार सेलू रेल्वे स्टेशनवर पोहचतात पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. पटरीने जवळपास ४५ किमी अंतर पायी कापल्याने कामगारांना थकवा जाणवत होता. पोलीसांनी त्यांना बिस्किटे दिली. सर्व १४ कामगारांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांना भांगडिया वस्तीगृहात ठेवणार
बेघर लोकांसाठी प्रशासनाने नूतन महाविद्यालयाच्या श्रीरामजी भांगडिया वस्तीगृहात व्यवस्था केली आहे. यापूवीर्ही ११ व्यक्तींना त्या ठिकाणी ठेवले आहे. या १४ कामगारांनाही याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. शहरातील काही दानशूर व्यक्तींनी दोन वेळा जेवण आणि चहा फराळाची व्यवस्था वस्तीगृहात केली आहे.