CoronaVirus : डॉक्टरांनो, खोटे प्रमाणपत्र द्याल तर कारवाई; बीड पोलिसांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 02:50 PM2020-04-10T14:50:43+5:302020-04-10T14:55:48+5:30
थेट संबंधित डॉक्टर, रुग्णवाहिका मालकांवर कारवाई करण्याचा इशारा
बीड : सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. असे असले तरी काही लोक मेडिकलचे खोटे कारण सांगून जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेर प्रवास करीत आहेत. परंतू असे समोर आल्यास थेट संबंधित डॉक्टर, रुग्णवाहिका मालकांवर कारवाई करण्याचा इशारा बीड पोलिसांनी दिला आहे. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही बीड पोलिसांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. तसेच आता जिल्ह्यात येण्यास - जाण्यास बंदी घालण्यात आली. केवळ अत्यावश्य सेवा आणि मेडिकलचे कारणे यातून वगळण्यात आली. याचाच गैरफायदा घेत काही लोक मेडिकलचे खोटे प्रमाणपत्र घेऊन जिल्ह्यांतर्गत व बाहेर प्रवास करीत असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
काही डॉक्टर, कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत, तर काही डॉक्टर ओळखीचा गैरफायदा देत इतरांना खोटे प्रमाणपत्र देत आहेत. आतापर्यंत काही कारवाई केली नाही. परंतु यापुढे जर असे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे उघड आल्यास थेट कारवाई केली जाईल, कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असा सक्त इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे.
खरोखरच मेडिकलचे कारण असल्यास परवानगी दिली जाईल, परंतू कारण नसताना केवळ व्यक्तीगत कामासाठी प्रमाणपत्र देऊन कोरोनासारख्या आजाराला निमंत्रण देऊ नका, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही बीड पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.