coronavirus : परभणी जिल्ह्यात १० कोरोना रुग्णांची वाढ; पूर्णा, पाथरीत आढळले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:07 PM2020-07-04T16:07:09+5:302020-07-04T16:07:47+5:30
दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
परभणी : जिल्ह्यात शनिवारी दुपारी प्रशासनाला १० संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. या नवीन रुग्णांमुळे परभणीतील कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे.
दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी जिल्हा प्रशासनाला दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये परभणी शहरातील गंगापुत्र कॉलनीतील ३, गणेश नगर, वैभव नगर, जवाहर कॉलनी येथील प्रत्येकी १आणि महात्मा फुले कॉलनीतील १ असे सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच पाथरी शहरातील एकता नगर, पूर्णा तालुक्यातील महागाव आणि परभणी तालुक्यातील करडगाव येथील प्रत्येकी एका रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. नवीन दहा रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १४१ झाली आहे. त्यातील ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३९ रुग्ण उपचार घेत आहेत.