CoronaVirus : आता आली 'एसआरपी'ची बारी; पराभणीकरांना होईल का गांभीर्याची जाणीव ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:16 PM2020-04-07T18:16:14+5:302020-04-07T18:17:28+5:30
एसआरपीची तुकडी सोमवारी रात्रीच दाखल झाली आहे
परभणी : संचारबंदीच्या काळात नागरिकांना नियमांची शिस्त लावत घरीच बसणे बंधनकारक करण्यासाठी आता राज्य राखीव पोलीस दलाला (एसआरपी) परभणीत पाचारण करण्यात आले आहे़ एसआरपीची तुकडी सोमवारी रात्रीच दाखल झाली असून, बुधवारपासून प्रत्यक्ष उपाययोजना सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळाली़
कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे़ या काळात सकाळी ७ ते १० हा वेळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना उपलब्ध करून दिला असला तरी त्यानंतरही दिवसभर शहरात वाहनांची वर्दळ दिसून येत आहे़ विशेष म्हणजे संचारबंदीबरोबरच जिल्हाधिका-यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्त्यावर वाहतूक करण्यास एका आदेशान्वये प्रतिबंध घातला आहे़
मागील १५ दिवसांपासून शहरात संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे़ तरीही नागरिकांना गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळेच आता थेट एसआरपीची कुमक पोलीस दलाने मागविली असून, ही कुमक परभणीत दाखल झाली आहे़ शहरातील रस्त्या-रस्त्यांवर एसआरपीचे पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत़ जिल्ह्याला प्राप्त झालेल्या एसआरपीच्या तुकडीपैकी कोतवाली, नानलपेठ आणि नवा मोंढा या तिन्ही पोलीस ठाण्यांना प्रत्येकी १ प्लाटून वितरित करण्यात आली आहे़ त्याचसोबत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे़ त्यामुळे आता परभणीतील नागरिकांना शिस्त लावण्याचे काम एसआरपीच्या माध्यमातून केले जाणार आहे़
पोलीस दलाकडून अनेक उपाय
संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विविध उपाययोजना केल्या़ सुरुवातीला नागरिकांना घरी बसण्याची विनंती करण्यात आली़ त्यानंतर दंडुक्याचा प्रसादही देण्यात आला; परंतु, तरीही रस्त्यावरुन फिरणा-या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याने दोन दिवसांपासून शहरातील सर्व रस्ते बॅरिकेटस् टाकून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत़ सुमारे ७० रस्त्यांवर लाकडी बॅरिकेटस् टाकले आहेत़ त्यानंतरही रस्त्यावर वाहन दिसल्यास वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे; परंतु, या कारवाईनंतरही रस्त्यावर फिरणााऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली नसल्याने आता एसआरपीला पाचारण करण्यात आले आहे़