coronavirus : परभणीतील संचारबंदी २५ मेपर्यंत वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 08:27 PM2020-05-16T20:27:59+5:302020-05-16T20:29:53+5:30
जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी २५ तारखेची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़
परभणी : जिल्ह्यात २५ मेपर्यंत संचारबंदी लागू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी सायंकाळी एका आदेशानुसार घेतला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यासाठी २५ तारखेची नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे़
परभणी जिल्ह्यात १७ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे़ सलग १६ दिवस जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही़ त्यामुळे आॅरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता़ नागरिकांनाही व्यवहार सुरळीत होण्याच्या आशा लागल्या़ मात्र १५ मे रोजी जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील तिघांना कोरोनाची लागण झाल्याने ग्रीन झोनच्या आशेवर पाणी फेरले गेले़ जिल्ह्यात ग्रीन झोनच्या कोणत्याही सवलती अद्याप लागू नाहीत़ उलट जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी १७ मे रोजी संपणार आहे़ त्यामुळे देश पातळीवरील नवीन लॉकडाऊन आणि जिल्ह्यातील संचारबंदी या विषयी नागरिकांना उत्सुकता लागली होती़
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील व्यवहार सुरू होतील़ किमान लघु व्यवसायाला सवलती दिल्या जातील, अशी येथील नागरिकांना अपेक्षा होती़ मागील ५३ दिवसांपासून व्यवहार ठप्प असल्याने लघु व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे़ या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात थोडी शिथिलता मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावासियांना होती़ मात्र शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश जारी केला असून, त्यात परभणी जिल्ह्यात २५ मेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहित १९७३ चे कलम १४४ लागू केले आहे़ या काळात पूर्वी सूट असलेल्या अत्यावश्यक सेवा, आस्थापनांना सूट देण्यात आली आहे़ या आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे़
जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक वेळी ग्रीन झोनच्या सलवतींची आशा लागलेली असतानाच ऐन शेवटच्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ग्रीन झोनच्या सलवतींपासून मुकावे लागत आहे़ पुणे येथून आलेला युवक हा शेवटच्या टप्प्यात परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळला़ त्यानंतर हा युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर सेलू येथील महिला नांदेडमध्ये कोरोनाबाधित आढळली; परंतु, प्रशासनाच्या चुकीमुळे परभणी जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाला नव्हता़ यावेळीही ग्रीन झोनच्या आशा लागलेल्या असतानाच पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पाणी फेरले आहे़