coronavirus : पायपीट करून आलेल्या मजुरांचे परभणी जिल्ह्याच्या सीमेवर लोंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:21 PM2020-04-02T17:21:40+5:302020-04-02T17:22:09+5:30
मजुरांचे अन्नपाण्याविना होत आहेत हाल
पाथरी : राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व सिमाबंद केल्या आहेत. मात्र जिल्ह्याच्या सीमांवर बाहेर गावची मजूर शेकडो किमीची पायपीट करून पुढे जाण्यासाठी दाखल होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी ( दि. 2 ) परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव सीमेवरील चेक पॉईंटवर कर्नाटकातून चालत आलेले 10 मजूर आढळून आले. तसेच इतर 22 ऊसतोडणी करणारे मजूर जिल्ह्यात प्रवेश बंद असल्याने अडकून पडले आहेत.
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाऊन सोबत संचारबंदी सुरू असल्याने बाहेर अडकलेल्या लोकांचे विशेषतः मजुरांचे अतोनात हाल होत आहेत. अडकलेल्यापैकी बहुतांश बाहेर जिल्ह्यातील अथवा कर्नाटकातून परतलेले ऊसतोड मजूर आहेत. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील लोणी तांड्यावर 92 मजूर याच अवस्थेत आढळून आले होते. त्या सर्वांना आता एका मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात आले.
ढालेगाव येथे जिल्हा सीमा आहे या ठिकाणी पाथरी पोलिसांच्या वतीने चेक पॉईंट लावण्यात आला आहे, गुरुवारी लोकमत प्रतिनिधीने दुपारी 2 वाजता येथे भेट दिली. यावेळी अत्यावश्यक सेवेची वाहनेसुद्धा पूर्ण तपासणी करून सोडली जात असल्याचे दिसून आले. दुचाकी वाहने केवळ दवाखान्याची कारणे असतानाच सोडली जात होती. याचवेळी वाशीमकडे जाणारे 10 मजूर सीमेवर येऊन दाखल झाले. रोडचे काम करणारे हे सर्व मजूर कर्नाटकातुन 25 मार्च रोजी निघाले होते. 2 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पोहचले त्यांना तेथेच अडविण्यात आले. यासोबतच 22 ऊस तोड मजूर जळगाव येथे जाण्यासाठी मुकदमा सोबत ट्रॅक्टर ने सकाळी 6 वाजता जिल्हा सीमेवर आले होते. त्यांच्या सोबत 6 लहान मुले आहेत. तर सकाळी 10 वाजता पंढरपूर येथून वाहनाने आलेली मंठा येथील 12 जण बीड पोलिसांनी वाहन ताब्यात घेतल्यानंतर पायी चालत पाथरी तालुक्यातील ढालेगाव , रामपुरी, वडी मार्गे निघाले होते. वाडी येथील नागरिकांनी त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. त्या नंतर वडी येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये नोंदणी केल्या नंतर त्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली. जिल्ह्याच्या सीमेवरून सर्व मजूर गावाकडचा रस्ता पकडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे.