CoronaVirus : परभणीकरांना मिळणार घरपोच किराणा; प्रशासनाने विकसित केले अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 02:38 PM2020-04-07T14:38:23+5:302020-04-07T14:40:08+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने गर्दीमध्ये वाढ होत आहे़ त्यातून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता
परभणी : संचारबंदी काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता अँड्रॉईड अॅप तयार केले असून, या अॅपद्वारे परभणीकर नागरिकांना घरेपाच किराणा व इतर साहित्य उपलब्ध होणार आहे़
जिल्ह्यामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत आहेत़ त्यामुळे किराणा साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने गर्दीमध्ये वाढ होत आहे़ त्यातून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता असल्याने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता अँड्रॉईड अॅपची निर्मिती करण्यात आली आहे़
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून पीबीएन शॉप हे अॅप विकसित करण्यात आले आहे़ त्याद्वारे नागरिकांना घरी बसून खरेदी करता येणार आहे़ किराणा मालासाठी देखील घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही़ ही सेवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने दिली जाणार आहे़ त्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि मॅप आॅन कंपनीचे सीईओ सचिन बाळासाहेब देशमुख यांच्या वतीने हे अॅप विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे़ निवासी
उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयसीचे सुनील पोटेकर यांनी संगणक प्रणाली विकसित केली़ त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योत्स्ना धुळे, नायब तहसीलदार विकास पाटील यांचे सहकार्य लाभले़ ६ एप्रिलपासून हे अॅप कार्यरत झाले आहे़
असे डाऊनलोड करा अॅप
नागरिकांनी गुगल प्ले स्टोअर्समध्ये जावून पीबीएन शॉप हे अॅप विनामूल्य डाऊनलोड करून घ्यावे़ तसेच संगणकावरही डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीबीएनशॉप डॉट इन या संकेतस्थळावर ही प्रणाली वापरता येणार आहे़ याद्वारे नागरिकांनी आवश्यक असलेली किराणा मालाची आॅर्डर दिल्यानंतर २४ तासांच्या आत ही आॅर्डर घरपोच पोहचती केली जाणार आहे़ आॅर्डर नोंदविताना नागरिकांना मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता सुस्पष्टपणे नोंदवावा लागाणार आहे़ घरपोच डिलेव्हरी करणारे स्वयंसेवक पावती दाखविल्यानंतर पावतीत नमूद केल्या प्रमाणे रक्कम स्वयंसेवकांना द्यावयाची आहे़ याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाने कॅशआॅन डिलेव्हरीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे़ तसेच यापूर्वी कार्यरत असलेली व्हॉटस्अॅपद्वारे स्वयंसेवी संस्थांकडून दिली जाणारी सेवाही कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले़