Coronavirus In Parabhani : बडेजावाचा थाट... अनेकांची लावून गेला वाट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 02:18 PM2020-07-20T14:18:23+5:302020-07-20T14:18:51+5:30

स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सद्गुणाचा सुगंध मैलावरुनही येतो, असे म्हटले जाते; परंतु, गंगाखेड येथील एका व्यापाऱ्याला स्वत:च्या संपत्तीचे आणि ऐश्वर्याचे कोरोनाच्या संकटात प्रदर्शन करण्याचा मोह टाळता आला नाही.

Coronavirus In Parabhani: Many people are in Corona positive due to businessman's money show off | Coronavirus In Parabhani : बडेजावाचा थाट... अनेकांची लावून गेला वाट...!

Coronavirus In Parabhani : बडेजावाचा थाट... अनेकांची लावून गेला वाट...!

Next

- अभिमन्यू कांबळे

परभणी : कोरोनाच्या संकट काळात सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवून स्वत:ची संपत्ती व ऐश्वर्याचा दिखाऊपणा करण्यासाठी गंगाखेड येथील व्यापाऱ्याने केलेल्या बडेजावाचा थाट अनेकांची वाट लागून गेला आहे. त्यामुळे जवळपास १०० जण कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची गंभीर स्थिती पहावयास मिळत आहे.

स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सद्गुणाचा सुगंध मैलावरुनही येतो, असे म्हटले जाते; परंतु, गंगाखेड येथील एका व्यापाऱ्याला स्वत:च्या संपत्तीचे आणि ऐश्वर्याचे कोरोनाच्या संकटात प्रदर्शन करण्याचा मोह टाळता आला नाही. २५ जून रोजी मुलाचा लातूर येथे विवाह समारंभ झाल्यानंतर २८ जून रोजी गंगाखेड येथे ठेवलेला स्वागत सोहळा जिल्हावासियांच्या मुळावर आला आहे. सर्वसामान्य व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी घ्यायची म्हटलं तर भलेमोठ्या नियमांची यादी दिली जाते. शिवाय नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा दमही दिलेला असतो. 

गंगाखेडचा कार्यक्रम मात्र सर्व नियम ढाब्यावर बसवून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार, खासदार, महसूल, पोलीस आदी विभागातील अधिकारी, उद्योजक, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्तींनी हजेरी लावली. त्यांना चांदीच्या ताटात जेवण दिले. आणि त्यातील काहींना जाताजाता कोरोना प्रसादही दिला गेला, अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. स्वागत समारंभ आयोजित केलेल्या व्यापाऱ्याच्या घरातील वृद्ध महिला ५ जुलै रोजी कोरोनाबाधित निघाली. त्यानंतर या कार्यक्रमाला हजेरी लावेल्या जवळपास १०० जणांना आतापर्यंत कोरोनाने घेरले आहे. 

जिल्हा प्रशासनाने रॅपीड टेस्ट करण्यासाठी खास गंगाखेडसाठी अ‍ॅन्टीजेन कीट मागविल्या. त्याद्वारे जवळपास ३३६ व्यक्तींची तपासणी केली. अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या मनामध्ये सातत्याने आपण पॉझिटिव्ह तरी येणार नाही ना, याची भीती कायम आहे. अशातच गंगाखेड शहरातील दोन व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे क्वारंटाईन असलेल्या व गंगाखेड शहरातील प्रत्येक व्यक्तीला आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना एक-एक दिवस काढणे अवघड जात आहे. त्यांची मानसिक स्थिती, सातत्याने येणाऱ्या कोरोनाच्या बातम्या यामुळे हे सर्व व्यक्ती आज घडीला जीवनमरणाच्या यातना सहन करीत आहेत. मानिसकदृष्ट्या त्रस्त  आहेत. 

या सर्व परिस्थितीला गंगाखेड येथील संबंधित व्यापारी आणि या व्यापाऱ्यास असा जाहीर कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध न करता साथ देणारे अधिकारी, राजकीय नेते जबाबदार आहेत. हजारो लोकांना संकटाच्या खाईत लोटणाऱ्या या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा प्रशासनाने स्वत:हून उगारावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती; परंतु, त्याकडे कानाडोळा करण्यात आला. शेवटी पत्रकार आणि काही सुजान नागरिकांच्या दबावातून विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधित व्यक्तीकडून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या प्रति व्यक्तीच्या खर्चापोटी ५ हजार तर क्वारंटाईन  प्रति व्यक्तीच्या खर्चापोटी २ हजार रुपये असा एकूण ५ लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी तशी नोटीस काढण्याची सूचना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिली. कंकाळ यांनी ११ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजक राधेशाम रतनलाल भंडारी यांना नोटीस बजावली. त्यात ७ दिवसांत ५ लाख रुपयांची रक्कम भरावी, असे सूचित करण्यात आले; परंतु, गेल्या ८ दिवसांपासून ही नोटीस संबंधितांना तामीलच झाली नाही. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था किती तकलादू आहे, याचे उदाहरण पहावयास मिळत आहे. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ असे म्हणतात. आता कायद्याचे पालन न करणाऱ्या आणि ज्यांच्यावर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, अशा नाठाळांवर भारतीय संविधानातील कलमांची काठी जोरात हाणली पाहिजे. तरच बडेजावाचा थाट करुन अनेकांची वाट लावणाऱ्यांना जरब बसेल.

Web Title: Coronavirus In Parabhani: Many people are in Corona positive due to businessman's money show off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.