coronavirus : परभणीत मयत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह ; जिल्ह्याची रुग्णसंख्या २२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:18 AM2020-05-23T10:18:11+5:302020-05-23T10:21:49+5:30
मुंबईतील वाशी भागातून जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे मूळ गावी आलेली महिला २० मे ला मृत झाली होती
परभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरील गाव शनिवारी सकाळी सील केले आहे.
मुंबईतील वाशी भागातून जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे मूळ गावी आलेली एक ५२ वर्षीय कोरोना संशयित महिला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेचे स्वॅब तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या संदर्भातील अहवाल शनिवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये मयत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावंगी भांबळे हे गाव सील केले असून या गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सकाळीच गावाला भेट दिली. त्यानंतर महिलेच्या संपर्कातील १३ जणांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, परभणी शहरातील पेडगाव रोड भागातील एका मुलीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ झाली आहे. त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.