CoronaVirus : गंगाखेडकरांना दिलासा; कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:18 PM2020-04-04T15:18:33+5:302020-04-04T15:21:38+5:30
आरोग्य विभागासह ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास
गंगाखेड: पुणे येथील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकाच गावातील दहा जणांना दि. १ व ३ एप्रिल रोजी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून शुक्रवार रोजी स्वॅब पाठविलेल्या एकाचा रिपोर्ट प्रलंबित आहे. उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंत दाखल झालेल्या २४ जणांपैकी २३ जणांचे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांनी सांगितले आहे.
पैठण येथील नाथशष्टी यात्रेदरम्यान संपर्कात आलेल्या पुणे येथील नातेवाईकाला कोरोना झाल्याचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या एकाच गावातील दहा जणांना दि. १ एप्रिल व दि. ३ एप्रिल रोजी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्वांचे स्वॅब नमुने घेऊन औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले होते. एकाच गावातील दहा जण पुणे येथील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्य विभागासह तालुक्यातील नागरिकांत खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे सर्वांच्याच मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असतांनाच एका वृत्तमान पत्रात संशयीत रुग्णाच्या गावाचे नाव प्रसिध्द झाल्याने दि. २ एप्रिल व दि. ३ एप्रिल रोजी त्या गावातील नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
दि. ३ एप्रिल शुक्रवार रोजी रात्री उशीराने या संशयीतांच्या स्वॅबचा कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त होताच आरोग्य विभागाबरोबरच संबंधित गावातील नागरिकांनी ही सुटकेचा श्वास सोडला. दि. ४ एप्रिल शनिवार रोजी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या एकाच गावातील नऊ जण व अन्य दोघे अशा एकूण अकरा जणांना सुट्टी देत या सर्वांना होम क्वारंटाईन करत घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
दि. १७ मार्च ते दि. ३ एप्रिल दरम्यान गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एकुण २४ संशयीतांपैकी २३ जणांच्या स्वॅब नमुन्यांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असून एकाचा रिपोर्ट प्रलंबित असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या संशयितांमध्ये गंगाखेड शहरासह तालुक्यातील विविध गावातील नागरिकांचा तसेच उपजिल्हा रुग्णालयातील एक व खाजगी एक अशा दोन डॉक्टरांचा समावेश होता. कोरोना प्रतिबंधक उपाय योजना अंमलबजावणी म्हणून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात तालुक्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरातच राहावे असे अवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी केले असून रुग्णालयातुन सुट्टी झालेल्या सर्व रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.