coronavirus : परभणीत कोरोनाचा दुसरा बळी; ६० वर्षीय बाधीत व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 08:11 AM2020-05-30T08:11:37+5:302020-05-30T08:12:38+5:30
वाघी बोबडे येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू
परभणी : जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथे पनवेल येथून 15 मे रोजी 60 वर्षीय व्यक्ती पत्नी व मुलासह एका खाजगी जीपद्वारे दाखल झाला होता. त्यानंतर या पती-पत्नीस गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. 27 मे रोजी सदरील रुग्णास छातीमध्ये त्रास होत असल्याने परभणी येथील वसमत रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे खासगी डॉक्टरांनी ह्रदयविकारांच्या अनुषंगाने त्याच्यावर उपचार केले. त्यावेळी संबधित व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले होते.
यावेळी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. ते तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. याबाबतचा अहवाल शुक्रवारी दुपारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात सदरील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर या व्यक्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबधित व्यक्तीच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील एक महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.