CoronaVirus : वा रे प्रशासन ! भर उन्हात माळरानावर केले ४२ जणांना क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:38 PM2020-04-25T16:38:20+5:302020-04-25T16:39:12+5:30
42 ऊसतोड कामगार लहान मुलांसह भर उन्हात डोंगरावर राहण्यास मजबूर
जिंतूर : तालुक्यातील वरुड नरसिंह येथे सांगलीहून आलेल्या ऊसतोड कामगारांना गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. यामुळे ४२ ऊसतोड कामगार दोन दिवसापासून कसलाही निवारा नसताना डोंगरावर राहण्यास मजबूर झाले आहेत.
तालुक्यातील वरुड नरसिह येथील 42 ऊस तोड कामगार सांगली जिल्ह्यातील माढा येथे साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते. 23 एप्रिल रोजी हे सर्व कामगार ट्रॅक्टरद्वारे जिंतूरला आले, प्रशासनाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून वरून नरसिह येथील शाळेमध्ये क्वारेंटाईन केले. परंतु गाववकर्यांनी व ग्रामसेवक, पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष ,सरपंच , तलाठी यांनी शाळेत क्वारंटाईन करण्यास विरोध केला. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारेंटाईन करण्याऐवजी गावाच्या बाहेर दीड किलोमीटर अंतरावरील डोंगरावर जाण्याचा सल्ला दिला. गावापासून दूर दीड किमी अंतरावर असणाऱ्या डोंगर-माळावर कसलीही सुविधा नसताना नाईलाजाने राहाव लागत आहे.
ना निवारा ना अन्न पाण्याची सोय
येथे निवारा,पाणी,वीज,जेवण याची कसलीच व्यवस्था नाही. सावलीसाठी एका झाडाचा आसरा घेत ते दिवस काढतात तर रात्री अंधारात ओसाड माळरानावर झोपातात. तहान लागल्यास बाजुच्या शेतातील जनावरांसाठी साठवलेले शेवाळेयुक्त हौदातील पाणी प्यायचं असे विदारक चित्र आहे. यामुळे महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत. ही देखील माणसं आहेत, याची जाणीव ना प्रशासनाला ना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना आहे.
समितीवर कारवाई करा
या सर्व प्रकरणाला गावातील सरपंच व ग्रामसेवक ,पोलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष, ही कमिटी जवाबदार आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी किमान शासनाने प्रतिनिधी म्हणून सर्व बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असताना असा घाणेरडा प्रकार झाला. या सर्वावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता व्ह्हो्उ शकला नाही.