CoronaVirus : धक्कादायक ! जिल्हाबंदी असतानाही ११० जणांचा मानवत तालुक्यात शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:58 PM2020-04-16T18:58:11+5:302020-04-16T18:58:53+5:30
जिल्हा बंदी असताना देखील शहरात प्रवेश कसा दिला जात आहे असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
मानवत : जिल्हाबंदी असतानादेखील १ एप्रिल ते १६ एप्रिल या दरम्यानच्या काळामध्ये ११० जणांनी शहराच्या हद्दीत प्रवेश केल्याचे ग्रामीण रुग्णालयात झालेल्या नोंदीवरून समोर आले आहे.यावरून जिल्हा बंदी असताना देखील शहरात प्रवेश कसा दिला जात आहे असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात १ एप्रिल २०२० रोजी ८ जण मुंबई, पुणे ,अजमेर या ठिकाणाहून आले तर २ एप्रिल रोजी पाच जण मुंबई, पुणे ,सातारा या ठिकाणाहून आले अशाच प्रकारे १५ एप्रिल पर्यंत शहरातील व तालुक्यातील हद्दीत साधारणतः ११० जणांनी तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला ठिकठिकाणी नाका-बंदी असतानादेखील या लोकांना प्रवेश कसा मिळतो या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळणे अवघड झाले आहे याबाबत तहसील प्रशासन व पोलिसही बोलत नसल्याचे दिसून येत आहे.
सेलू तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यात प्रवेश करणाऱ्या मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यास तालुक्यात प्रवेश नाकारला. ही बातमी सर्व जिल्ह्यात गाजली मात्र तालुक्यात अशी कडक भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे दररोज बाहेरून येणारे लोंढे कमी होत नसल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे. या वरिष्ठ प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती कठोर कारवाई करीत तालुक्यातील बाहेरून येणारे लोंढे थांबवावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवावा
जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पोलीस प्रशासन कडक भूमिका घेऊन त्या त्या शहरात कडक पावले उचलीत आहेत. संचार बंदीचे नियम मोडल्यास नियम मोडणाऱ्या वर गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र मानवत तालुक्यात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर महाराणा प्रताप चौक या एकमेव ठिकाणीच पोलीस बंदोबस्त लावला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या इतर मार्गावर बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासन तसदी घेत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन शहरात गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.