coronavirus : गंगाखेडमध्ये बाहेरगावाहून आलेली तिघे कोरोना संशयीत; विलगीकरण कक्षात उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:21 PM2020-03-18T17:21:00+5:302020-03-18T17:25:05+5:30
कोरोनाचे तीन संशयीत शहरात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गंगाखेड: पुणे, सौदी अरेबिया येथून व परराज्यातून शहरात आलेले तिघे सर्दी, खोकला, ताप तसेच घशाच्या खवखवीने त्रस्त झाल्याने कोरोनाच्या संशयाने त्यांना उपचारासाठी येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकास परभणी येथे पाठविण्यात आले तर दोघांना डॉक्टरांच्या निगराणीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे तीन संशयीत शहरात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या शहरात उद्योग व्यवसायांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने तेथील कामगार गावी परतत आहेत. यातच सौदी अरेबिया येथे कामासाठी असलेल्या भारतीय नागरीकांना तेथून परत पाठविण्यात येत आहे. यामुळे शहरात बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातच पुणे, सौदी अरेबिया आणि पर राज्यातून परतलेल्या तिघांना सर्दी, ताप आणि घशात खवखव असा त्रास जाणवत होता. यामुळे कोरोनाच्या संशयावरून त्यांना येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा गौस, डॉ. केशव मुंडे यांच्या निगराणीखाली संशयितांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांचे स्वॅबचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाचे संशयीत आढळून आल्याची माहिती समजताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.