CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगची एशितैशी ! परभणी जिल्ह्यात बँकांसमोरील गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 02:28 PM2020-04-09T14:28:03+5:302020-04-09T14:31:51+5:30
पैसे काढण्यासाठी बँका आणि ग्राहक सेवा केंद्रासमोर गर्दी
परभणी : केंद्र शासनाच्या जनधन योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले पाचशे रुपयांचे अनुदान बँकेतून काढण्यासाठी परभणी जिल्ह्यातील बहुतांश बँका आणि ग्राहक सेवा केंद्र समोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी जमू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात हे चित्र कायम आहे.
कोरोना संदर्भात लॉक डाऊन करण्यात आल्यानंतर केंद्र शासनाने जनधन योजनेअंतर्गत महिला खातेदारांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे 1 हजार पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने हे अनुदान तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बँकांमध्ये संबंधित खातेदाराच्या बँक खात्यावर जमा झाले. अनुदानाची ही रक्कम काढण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. बँकेत एकाच ग्राहकाला प्रवेश दिला जात असला तरी बँकेबाहेर मोठी गर्दी होत आहे. ही स्थिती गुरुवारीही परभणी शहरासह, गंगाखेड, पाथरी, जिंतूर आदी शहरांमधील बँका समोरही पहावयास मिळाली. त्यामुळे आता गर्दी टाळण्याच्या अनुषंगानें प्रशासनास ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या कडक निर्णयामुळे तसेच नागरिकांनीही त्याला साथ दिल्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. विशेष म्हणजे परभणीच्या चारही शेजारी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना या संदर्भात अधिक गांभीर्याने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशात बँकांसमोर गर्दी दिसत असल्याने नागरिकांची धडधड वाढली आहे.