CoronaVirus : आम्ही एक वेळ जेवण करु; पण जनावरांचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:50 PM2020-04-07T18:50:42+5:302020-04-07T18:52:21+5:30
या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत.
परभणी : कोरोना या आजाराची लागण होऊ नये म्हणून शासनाने २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ सुरु केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत.
नवीन मोंढा येथे जवळपास २५ बैलगाडी चालक असून बैलगाडी हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे; परंतु, गेल्या १३ दिवसांपासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या आयुष्यात अशी वेळ कधीच आलीच नव्हती ती लॉकडाऊनने आमच्यावर आणली आहे. आम्ही एकवेळ जेवण करुन राहू शकतो; परंतु, आमचा ज्यावर उदरनिर्वाह चालतो त्या मुक्या जनावरांचे काय, असा प्रश्न शेख महेमूद शेख मस्तान, शेख मोहसीन शेख यासीन, शेख तुराब शेख रियाज, शेख अन्वर शेख हबीब, शेख हसन शेख पाशा या बैलगाडी चालकांनी केला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून वैरणीचे दरही वाढले आहेत. २० रुपयाला मिळणारी पेंढी आता २५ रुपयाला मिळत आहे. हिवाळा व पावसळा हिरवा चारा बैलांना मिळू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवा चाराही मिळणे शक्य होत नाही. घरी बसावे तर लेकराबाळांना काय खाऊ घालावे आणि बाहेर निघावे तर लॉकडाऊन, या परिस्थितीमुळे आमची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीप्रमाणे झाली आहे, असे ते म्हणाले.
‘कामाला येतो; पण आंतराने बसतो’
कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून आम्ही शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करीत आहोत. हाताला काम मिळावे, म्हणून आजही आम्ही लॉकडाऊन असले तरी मोंढ्यात येवून बसत आहोत. बैलगाडी सावलीच्या ठिकाणी बांधून बैलांना वरण टाकून आंतराअंतराने बसतो. यापूर्वी दिवसाकाठी हजार-बाराशे रुपये मिळायचे; परंतु, कोरोना या आजारामुळे दोनशे रुपये मिळणेही मुश्कील झाले आहे. कधी-कधी तर पेंढीचे दुकान बंद असल्यामुळे बैलांना वैरणही टाकू शकत नाही, याची मनाला खंत वाटते, असे बैलगाडी चालक म्हणले.