कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांना दिलासा; खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:31 PM2020-03-28T18:31:47+5:302020-03-28T18:35:02+5:30
4 हजार शेतकऱ्यांना दिलासा
सेलू:- संचारबंदी लागू असली तरी सीसीआयकडे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे .
बाजार समितीच्या सीसीआय कडून दोन महिन्यापासून कापसाची खरेदी केली जात होती. खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कडून समाधानकारक दर मिळत असल्याने शेतक-यांनी सीसीआयकडे आपल्या कापसाची विक्री सर्वाधिक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु आणि त्यानंतर संचारबंदी लागू झाल्याने १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना आपली रक्कम कधी जमा होईल? उशीर झाला तर खर्च कसा भागविणार याची चिंता लागली होती.
माञ बाजार समिती आणि सीसीआयच्या अधिका-यांनी समन्वय साधत त्या सात दिवसातील कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना त्यांची रक्कम बॅक खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सीसीआय च्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात सर्व बाबी ची पुर्तता आणि चुकीचे खाते नंबर आयएफसी कोड आदी तांत्रिक दुरूस्ती करण्यासाठी ये - जा करावी लागणार असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करून शेतक-यांच्या बॅक खात्यावर लवकरात लवकर रक्कम जमा करण्यासाठी ये-जा करण्याची परवानगी मागण्यात आली. बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी शेतक-यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर बाजार समितीने सीसीआयच्या रनर असलेल्या व्यक्तीला वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे कापूस विक्री करून आपली रक्कम कधी जमा होईल याची चिंता शेतक-यांना होती.
सुमारे चार हजार शेतकरी
१६ ते २३मार्च या काळात सुमारे ६० हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआय कडून करण्यात आली. यात जवळपास चार हजार शेतक-यांचे ४० कोटी रुपये आहेत. २३ मार्च नंतर संचारबंदी लागू झाल्याने कापूस खरेदी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यामुळे १६ ते २३ मार्च दरम्यान ची बीले तयार करणे तसेच चुकीचे खाते नंबर आणि इतर प्रक्रिया करण्यासाठी सीसीआय च्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना औरंगाबाद तसेच इतर ठिकाणी जाऊन सर्व बाबी पूर्ण करावी लागतात. संचारबंदी लागू झाल्यानंतर ही प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वाढली होती.माञ जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी हा प्रश्न समजून घेऊन आणि शेतक-यांची गरज लक्षात घेत संचारबंदीतही ही प्रक्रिया सुरू ठेवण्ययाची सुचना दिली. शेतक-यांना कापूस विक्रीची रक्कमे बाबत संभ्रम निर्माण झाला होता. माञ ३१ मार्च पर्यंत सर्व ४० कोटी रुपयांची सुमारे ४ हजार शेतक-यांची रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर जमा होईल. त्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी दिली.