कापूस खरेदी मर्यादा व्यापाऱ्यांच्या पथ्थ्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:42+5:302021-01-04T04:14:42+5:30
सेलू :- सीसीआयकडून दररोज ६ हजार क्विंटल कापसाची खरेदीची मर्यादा घातल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली असून हा ...
सेलू :- सीसीआयकडून दररोज ६ हजार क्विंटल कापसाची खरेदीची मर्यादा घातल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली असून हा निर्णय खाजगी व्यापाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडत आहे.
किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी आणत आहेत. १९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून ९ कापूस जिनिंगवर खरेदी केली जात आहे. त्यामुळे सेलूसह परजिल्ह्यातून कापूस विक्रीसाठी गर्दी झाली आहे. अवघ्या दीड महिन्यांत तब्बल ४ लाख क्विंटल एवढी कापसाची सीसीआयकडून खरेदी करण्यात आली आहे. अगोदरच आठ - आठ दिवस कापसाचे माप होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच सीसीआयकडून तीन दिवसांपूर्वी दररोज ६ हजार क्विंटल कापसाची खरेदीची मर्यादा घातल्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. या निर्णयानंतर किरकोळ बाजारात ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी केली जात आहे. तर सीसीआय त्याच कापसाला ५ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करते. नोव्हेंबरपासून सीसीआय केंद्रावर ६०० वाहनांतून कमाल १० ते १५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला जात होता. मर्यादा घालून दिल्याने आता ६ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात असून आता २०० वाहनांचे माप होत आहे. त्यामुळे आणखी शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, गरजू शेतकऱ्यांचा कापूस खाजगी व्यापारी आणखी कमी दराने खरेदी करीत आहेत.
१५०० वाहने यार्डात
बाजार समितीचा कापूस यार्डात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने बोर्डीकर, मंत्री मैदानावर जवळपास ३० एकर परिसरात कापसाची वाहने उभी आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचे वाहने यार्डात घेऊन त्याचे माप अगोदर व्हावे याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी दिली.