पडीत विहिरीमध्ये पडली गाय, क्रेनच्या सहायाने रेस्क्यू
By राजन मगरुळकर | Published: April 7, 2024 01:24 PM2024-04-07T13:24:33+5:302024-04-07T13:24:51+5:30
परभणी शहरातील येलझरकर कॉलनी भागातील घटना
परभणीः वसमत रोड परिसरातील येलदरकर कॉलनी भागातील एका पडीत विहिरीमध्ये रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गाय पडली. सुमारे १५ ते २० फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये गाय पडल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मनपा अग्निशमन विभागाला दिली. मनपाच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात मदत कार्य सुरू झाले. या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न केले.
शहरातील वसमत रोड परिसरात येलदरकर कॉलनी वसाहत आहे. या वसाहतीत एक पडीत असलेली विहीर आहे. या विहिरीमध्ये रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक गाय पडल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजली. नागरिकांनी तेथे जाऊन गायीला बाहेर कसे काढावे, यासाठी प्रयत्न केला. यामध्ये परिसरातील माजी नगरसेवक सचिन देशमुख, अनिल नलावडे व इतर नागरिकांनी ही बाब मनपाच्या अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, फायरमन गौरव देशमुख, उमेश कदम, अक्षय पांढरे, वाहन चालक वसीम अखिल अहमद हे घटनास्थळी दाखल झाले.
केवळ अग्निशमन यंत्रणेकडून सदरील काम शक्य नसल्याने या ठिकाणी क्रेन मागविण्यात आले. रेस्क्यू दरम्यान सदरील विहिरीमध्ये अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांनी स्वतः जाऊन गायीला दोरी बांधून त्या क्रेनद्वारे विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अवघ्या अर्ध्या तासात सदरील गायीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मनपाच्या अग्निशमन विभागासह परिसरातील नागरिकांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.