परभणी येथे आढळून आला पिवळ्या ठिपक्यांचा दूर्मिळ सर्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 07:01 PM2017-12-09T19:01:37+5:302017-12-09T19:02:09+5:30
मराठवाड्यात दूर्मिळ असलेला पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप दोन दिवसांपूर्वी परभणी शहरातील अमेयनगर भागात आढळून आला.
परभणी : मराठवाड्यात दूर्मिळ असलेला पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप दोन दिवसांपूर्वी परभणी शहरातील अमेयनगर भागात आढळून आला. सर्पतज्ञांच्या मते या सर्पास यलो स्पॉटेड उल्फ स्नेक या नावाने ओळखले जाते. हा सर्प मुख्यत: मध्यप्रदेशातील बालाघाट, मांडला, विदिशा व गुजरात राज्यात आढळतो.
अमेयनगर येथील बाळासाहेब तुकाराम रेंगे यांच्या निवासस्थान परिसरात साप आढळून आल्याची ही माहिती सर्पमित्र सौरभ पवार यांना मिळाली. यानंतर पवार यांनी या सापास पकडले. परंतु, या सापाच्या प्रजातीची त्यांना माहिती नव्हती. यामुळे त्यांनी याची माहिती सर्पतज्ज्ञ विकास शेटे यांना दिली.
शेटे यांनी या सापाबद्दल सांगितले कि, हा सर्पास यलो स्पॉटेड उल्फ स्नेक या नावाने ओळखले जाते. हा सर्प मुख्यत: मध्यप्रदेशातील बालाघाट, मांडला, विदिशा व गुजरात राज्यात आढळतो. याची लांबी सरासरी ४० ते ४२ सें.मी. असते. याच्या शरीरावर काळ्या रंगावर पिवळसर ठिपके असतात. तसेच हा साप रात्रीच्या वेळीच बाहेर पडतो. उन्हाळा ते पावसाळा या दरम्यान तो अंडी घालतो. छोटे कीटक हे त्याचे अन्न असून तो बिन विषारी व दूर्मिळ आहे, असे शेटे यांनी सांगितले.