आयफोन डिलिव्हरीसाठी 'तारीख पे तारीख' देणाऱ्या फ्लिपकार्ट विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 03:04 PM2020-11-23T15:04:24+5:302020-11-23T15:13:27+5:30
ऑनलाइन खरेदी केलेला आयफोन महिना उलटूनही मिळालाच असल्याने अभियंत्यांची फ्लिपकार्ट विरोधात तक्रार
गंगाखेड (परभणी ) : फ्लिपकार्टवरून दिवाळीदरम्यान भरघोस सूट असलेला ऍपल कंपनीचा आयफोन पूर्ण पैसे भरून खरेदी केल्यानंतर महिना उलटूनही मिळाला नाही. तसेच कंपनीला सतत संपर्क करूनही 'तारीख पे तारीख' देत प्रतिसाद मिळाला नसल्याने एका अभियंत्यांने फ्लिपकार्ट विरोधात गंगाखेड पोलीस स्थानकात ८० हजार रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
सध्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बहुतांश ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत असल्याने ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्याकडून आकर्षक ऑफर नियमितपणे ग्राहकांना दिल्या जातात. मात्र अशाच एका ऑनलाइन व्यवहारात ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना गंगाखेड शहरात उघडकीस आली आहे. येथील एमएसईमध्ये अभियंता असलेले कैलास अनिल फड यांनी दिवाळी दरम्यान दि. १५ ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्टवरून बिग बिलियन डेज या ऑफरमधून १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा ऍपल आयफोन ११ प्रो हा ७९ हजार ९९९ रुपयांना खरेदी केला. आयफोन खरेदीत मोठी सूट मिळत असल्यामुळे फड यांनी नेट बँकिंगद्वारे आपल्या खात्यातून ७९ हजार ९९९ रुपये फ्लिपकार्ट कंपनीला लागलीच दिले. मात्र, तो आयफोन अद्याप त्यांना मिळालाच नाही.
कंपनीकडून 'तारीख पे तारीख'
कैलास फड यांनी दि. १५ ऑक्टोबर ते दि. २२ नोव्हेंबर दरम्यान फ्लिपकार्ट कंपनीकडे याबद्दल वारंवार चौकशी केली. आयफोन किंवा दिलेले पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र कंपनीकडून त्यांना वेगवेगळ्या तारखा सांगून फोन मिळेल असे सांगण्यात आले. कंपनीकडून मोबाईल किंवा पैसे मिळत नसल्याने फड यांनी रविवारी गंगाखेड पोलीस ठाणे गाठले. आयफोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट कंपनीसोबत केलेल्या ऑनलाइन व्यवहाराची कागदपत्रे सादर केली. दिलेल्या फिर्यादीवरून फ्लिपकार्ट कंपनी मर्चंटविरुद्ध फसवणूकीसह आयटी ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर या करीत आहेत.
ऑनलाइन आमिषाला बळी पडू नका
ऑनलाइन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ऑनलाइन व्यवहारात दिल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडू नका. महागड्या वस्तू ऑनलाइन खरेदी करतांना नागरिकांनी सजग राहत आपली फसवणूक तर होत नाही ना याची खात्री करूनच व्यवहार करावा. - वसुंधरा बोरगावकर, पोलीस निरीक्षक