आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:40+5:302021-03-18T04:16:40+5:30
औरंगाबाद येथील महावितरण कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयातील पथकाने जिंतूर तालुक्यातील विविध गावांमधील घरगुती वापराच्या विद्युत मीटरची १० व ११ मार्च ...
औरंगाबाद येथील महावितरण कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयातील पथकाने जिंतूर तालुक्यातील विविध गावांमधील घरगुती वापराच्या विद्युत मीटरची १० व ११ मार्च रोजी तपासणी केली. याअंतर्गत पाचलेगाव येथे केलेल्या तपासणीत येथील ग्राहक मुक्तीराम सुंदर बादड यांनी लघु वाहिनीवर आकडा टाकून २६ हजार १८० रुपयांची वीजचोरी केली. याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता विनायक उत्तमराव दिग्रसकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुक्तीराम सुंदर बादड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गावातील आयोध्या बाळासाहेब पांचाळ यांनीही आकडा टाकून विजेचा अनधिकृत वापर केल्याची बाब महावितरणच्या पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली. याबाबत आयोध्या पांचाळ यांनी ३० हजार ४०० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता दिग्रसकर यांनीच जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरे ग्राहकही पाचलेगाव येथीलच आहेत. येथील जानकीराम बाबूराव जावडे यांनीदेखील लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतरित्या वीज वापर करून पिठाची गिरणी चालविली. तसेच ४७ हजार ७१० रुपयांची वीजचोरी केली. याप्रकरणी दिग्रसकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जानकीराम बाबुराव जावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.