खासदार, आमदारांसह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:35 PM2020-07-24T18:35:32+5:302020-07-24T18:42:57+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
परभणी: येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात खा. बंडू जाधव, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांसह दाखल होऊन वारंवार संचारबंदी लागू करु नका, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या प्रकरणात सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन आ.लोणीकर यांच्यासह माजी आ.विजय गव्हाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, गणेशराव रोकडे, बालाप्रसाद मुंदडा व इतरांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनाधिकृतरित्या कार्यकर्ते जमवून घोषणाबाजी केली.
या कारणावरुन खा.बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, अर्जून सामाले, माणिक पोंढे, सदाशिव देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. त्याच प्रमाणे भाजपाचे माजी आ.विजय गव्हाणे आणि महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुध उत्पादकांना वाढीव भाव देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. या प्रकरणातही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.