अमिताभ बच्चन यांच्याविरूद्धचा फौजदारी दावा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 08:17 PM2018-12-06T20:17:08+5:302018-12-06T20:21:15+5:30
वकिलांची बदनामी केल्याचा होता आरोप
परभणी- कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात वकिलांची बदनामी केल्याच्या प्रकरणात चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीचे संचालक, निर्मात्याविरूद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी पुनर्विचार दावा परभणी येथील सहाय्यक सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
या संदर्भात परभणी येथील अॅड़ राजू शिंदे यांनी दिलेली माहिती अशी, सोनी या दूरचित्रवाहिणीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून वकिलांची बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा चित्रपट अभिनेता अभिताभ बच्चन, सोनी टीव्हीचे संचालक विवेक बहल, निर्माता सिद्धार्थ बासू यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अॅड़ विष्णू नवले पाटील यांनी १४ आॅगस्ट २०१३ मध्ये दाखल केली होती़ त्यानंतर या प्रकरणात दोन्ही बाजुंनी सुनावणी होवून न्यायालयाने या कार्यक्रमातील जाहिरातीतून वकिलांची बदनामी होत नाही, असे मानून ती तक्रार १० डिसेंबर २०१३ मध्ये खारीज केली होती.
याविरूद्ध अॅड़ नवले पाटील यांनी सत्र न्यायालयात फौजदारी पुनर्विचार अर्ज १८ डिसेंबर २०१३ मध्ये दाखल केला होता़ सत्र न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून असा निष्कर्ष काढला की, कौन बनेगा करोडपती कार्यक्रमासंदर्भातील जाहिरात वकिलांची बदनामी करीत नाही तर उलट ती जाहिरात वकिलांच्या समर्थनार्थ ठरते़ कारण ‘सिखना बंद तो जितना बंद’ हे वाक्य वकिलांना सल्ला देते़ म्हणून संबंधित अर्ज जिल्हा न्या़ ओंकार देशमुख यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी फेटाळला़ या प्रकरणात अमिताभ बच्चन व सोनी टीव्हीतर्फे अॅड़ राजू शिंदे यांनी काम पाहिले़ त्यांना अॅड़ मोहम्मद शाहेद यांनी सहाय्य केले़ या प्रकरणाचे निकालपत्र ६ डिसेंबर २०१८ रोजी प्राप्त झाले़