तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:36+5:302021-08-01T04:17:36+5:30
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यातच पावसाळ्यामुळे लहान मुलांना सर्दी, ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यातच पावसाळ्यामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप व अन्य आजाराची लक्षणे जाणवत आहेत. यामुळे पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता बालकाच्या आजारपणाला वेळीच रोखण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण कमी झाले असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे.
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
परभणी जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे अतिदक्षता विभाग बालकांसाठी कार्यान्वित केले आहे. यामध्ये लागणारा औषधीसाठा, आवश्यक असणारी यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार ठेवले आहे. गरज पडल्यास या यंत्रणा वापरल्या जाणार आहेत.
पंधरा वर्षाखालील रूग्ण ५७७८
कोरोनाचे एकूण रुग्ण ५११७५
सर्दी, खोकला, तापीची साथ
सध्या पावसाळ्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासह न्यूमोनिया, गॅस्ट्रो, टायफाईड, डेंग्यू या आजाराचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यासाठी सद्यस्थितीत पाणी उकळून प्यावे व बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे.
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही पण...
सध्या ताप, सर्दी, खोकला बालकांमध्ये आढळून येत असला तरी तो कोरोना आहे असे नाही. यासाठी सर्व लहान बालकांची काळजी घेत त्यांना वेळीच बाल रोग तज्ज्ञांकडे दाखवावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक असल्यास आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. कोरोना सुरू झाल्यापासून एप्रिल २०२० ते जून २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ० ते १५ वयोगटातील ५७७८ रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळली होती.
घाबरू नका, काळजी घ्या
सध्या फ्लूचे पेशंट वाढले आहेत. पालकांनी ६ महिने ते १८ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींचे फ्लूचे लसीकरण करून घ्यावे. अद्याप लहान मुलांची लस आली नसल्याने हे लसीकरण आवश्यक आहे. तसेच बालकांना ताप आल्यास तो अंगावर काढू नये.
-डॉ.अभिजीत चिद्रवार, बालरोगतज्ज्ञ.