पीक कर्ज वाटप २ टक्क्यावर ( दिल्लीसाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:34+5:302020-12-06T04:18:34+5:30
परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हा प्रशासनाने ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले ...
परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हा प्रशासनाने ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. मात्र बँक प्रशासनाकडून संथगतीने पीक कर्ज वाटप होत असल्याने रब्बी हंगाम संपत आला तरी केवळ २.१ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले होते. बॅंकांच्या संथगतीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, खरीप हंगाम संपला तरी केवळ ६६ टक्के पीक कर्ज वाटप केले. त्यामध्ये १ लाख ५७ हजार ५० शेतकऱ्यांना १ हजार ९२ कोटी ४० लाख रुपयांचे वाटप केले. आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढविणे आवश्यक होते. मात्र आतापर्यंत दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ २.१ टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. यामध्ये १ हजार १२० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे अद्यापही ४४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करणे बाकी आहे.
असे झाले पीक कर्ज वाटप
रब्बी हंगामात व्यावसायिक बँकांना दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ ६१३ शेतकऱ्यांना ४ कोटी ६७ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत १.८१ टक्के पीक कर्ज उद्दिष्ट गाठले आहे. त्यानंतर खासगी बँकांनी १८५ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकने अद्यापपर्यंत रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे खातेही उघडले नाही. त्यानंतर जिल्हा बँकेने ३२३ शेतकऱ्यांना १ कोटी ४९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत १.३४ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.