पीककर्जाचे उद्दिष्ट १२१३ कोटींचे; वाटप केवळ ५२१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:22+5:302021-08-14T04:22:22+5:30
जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या ...
जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेलादेखील बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील या वर्षीची पिके बहरात असतांना ही कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१-२२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ११ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील खाजगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ८२ हजार ९२ शेतकऱ्यांना ५२१ कोटी ९९ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत ४३ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला असून कोरोना काळात संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला बँकांनी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा बँक पोहोचली १०८ टक्क्यांवर
परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ११ ऑगस्टपर्यंत या बँकांनी २० हजार ५३५ शेतकऱ्यांना २०० कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ २५ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ १५७३ शेतकऱ्यांना १८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. या बँकांनी केवळ १८ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार २८९ शेतकऱ्यांना १४८ कोटी ५४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत ७९ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँके शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकेने आतापर्यंत ४२ हजार ६९५ शेतकऱ्यांना १५३ कोटी ८६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत १०७ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.