पावसाअभावी पिके संकटात; महिला शेतकऱ्याने पाच एकर कापसावर फिरवला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:34 PM2018-09-19T16:34:02+5:302018-09-19T16:42:10+5:30
तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे.
पाथरी (परभणी ) : तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे. पाण्याअभावी सोयाबीन करपून गेले असून कापूस पूर्णपणे सुकला आहे. या परिस्थितीमुळे बाभळगाव येथील एका महिला शेतकऱ्याने वैतागून ५ एकरवरील कापूस पिकावर नांगर फिरवला.
बाभळगाव मंडळात यावर्षी कमी पाऊस आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. नंतर थोडा फार पाऊस पडल्याने खरिपाच्या आशा जिवंत झाल्या. कापूस सोयाबीन ही दोन प्रमुख पिके तालुक्यात घेतली जातात. सोयाबीन चा पेरा १४ हजार हेक्टर तर कापसाचा पेरा १८ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामातील पिकांची अवस्था चांगली आहे असे वाटत असताना गेल्या २५ दिवसापासून पावसाने पूर्णतः खंड दिला आहे. पिके करपून आणि सुकून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस लांबला, तर कापूस ही सुकू लागला. त्यामुळे बोंड आणि पाते तसेच कापसाचे फुल पाने गळू लागले आहेत.
अशा परिस्थितीने त्रस्त होऊन बाभळगाव येथील महिला शेतकरी शोभा विठ्ठल ठोंबरे यांनी बाभळगाव येथील गट न २२९ मध्ये ५ एकर कपाशीची लागवड केली होती. पाऊसाचा दीर्घ खंड पडल्याने त्यांनी आज ५ एकर कापसावर नांगर फिरवला. या भागात सर्वच खरीप हंगामातील पिकांची वाईट अवस्था निर्माण झाली आहे, या मुळे याही वर्षी शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.