सुमारे ८० हजार हेक्टरवरील पिके बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:04+5:302021-08-13T04:22:04+5:30
परभणी : जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, बाधित ...
परभणी : जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, बाधित क्षेत्रात थोडाफार बदल होऊन पीक पंचनाम्यांचा अहवाल लवकरच अंतिम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्सूकता ताणली गेली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांत मोठा उत्साह होता. पावसाळी हंगामात होणाऱ्या पावसाच्या ७५ टक्के पाऊस या दोन महिन्यातच झाला. जुलै महिन्यात तर दोन वेळा अतिवृष्टी झाली. ११ जुलै रोजी परभणी व परिसरातील गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यानंतर २१ व २२ जुलै रोजी जिल्हाभरात अतिवृष्टीने थैमान घातले. जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये या दोन दिवशी अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. अतिवृष्टी आणि ओढ्या - नाल्यांना आलेल्या पुराने शेतशिवारात ठिकठिकाणी पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे ज्या पिकांवर भरोसा ठेवला तीच पिके हातची गेल्याने शेतकरी नाउमेद झाला आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले. अतिवृष्टीग्रस्त गावात प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जवळपास सर्वच तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल एकत्रित करण्याचे काम सध्या सरू आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल अद्याप अंतिम झाला नसल्याने त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत अहवाल अंतिम करून बाधित शेतकऱ्यांसाठी मदत मागण्याची तयारी केली जात आहे. ४८ कोटी रुपयांची आवश्यकता
अतिवृष्टीने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साधारणत: ६ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत दिली जाऊ शकते. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ४८ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. नुकसानीचा अहवाल अंतिम झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर मदतीसंदर्भातील निर्णय होणार आहे.
चार तालुक्यात सर्वाधिक नुकसान ११ जुलै रोजी परभणी तालुक्यातच अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर मात्र संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार परभणी, पालम, परभणी आणि पूर्णा या चार तालुक्यांमध्ये बाधित क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचा तालुकानिहाय आकडा स्पष्ट झाला नाही.