तीन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:11+5:302021-07-05T04:13:11+5:30
परभणी : जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या असून, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या ...
परभणी : जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यातच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या असून, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उगवलेली पिके कोमेजून जात आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मागील दोन वर्षांपासून खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस होत आहे; परंतु या हंगामाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी पावसाळ्यात सरासरीएवढा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्याचप्रमाणे जून महिन्यात सर्वाधिक पाऊस असल्याचीही शक्यता या विभागाने वर्तविली. त्यामुळे शेतकरी उत्साहाने पेरणीच्या तयारीला लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यातच सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली आहेत.
पेरणी झालेली पिके आता उगवली असून, कोवळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. याचवेळी पावसाने दगा दिला असून, १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. पिके ऊन धरू लागली असून मुळाजवळील ओलावा कमी होत असल्याने कोमेजून जात आहेत. अशा वेळी कोळपणी करून या पिकांना जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. तसेच या हंगामातील पिके हाताशी येत असतानाच अतिवृष्टीने पिकांची मोठी नासाडी केली होती. या संकटातून सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणी केली. मात्र, आता पाऊस गायब झाल्याने पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ येते की काय? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजामुळे फसगत
यावर्षी पाऊसमान चांगले राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या अंदाजावर भरोसा ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु पिके वाढीच्या कालावधीतच पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
हेक्टरी १५ हजार रुपयांचा भुर्दंड
जिल्ह्यात सद्य:स्थितीला सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. हे पीक पाण्याअभावी कोमेजून जात आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १५ हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय पिकाची उगवण क्षमता कमी होणार असल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातून एकूण पेरणी क्षेत्र
५ लाख २१ हजार १००
झालेली पेरणी १ लाख ८० हजार
सोयाबीन ८००००
कापूस ९७०००
तूर २०००
मूग ५००
उडीद २००
ज्वारी १०० क्षेत्र हेक्टरमध्ये