लर्निंग लायसन्ससाठी उमेदवारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:16+5:302020-12-13T04:32:16+5:30
वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांना संगणकावर परीक्षा देत असताना प्रत्यक्षात वाहन चालविण्याचीही चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. ...
वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांना संगणकावर परीक्षा देत असताना प्रत्यक्षात वाहन चालविण्याचीही चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने गेल्या आठ दिवसांपासून लर्निंग लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या उमेदवारांची अगोदर संगणकावर चाचणी घेतली जाते. यामध्ये त्यांना टीक पद्धतीचे १५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असून, ११ गुण मिळाल्यानंतर उमेदवाराला उत्तीर्ण समजले जाते. दररोज येथे १७५ उमेदवारांची लर्निंग लायसन्ससाठी चाचणी घेतली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालविण्याची चाचणी घेतली जाते. यावेळी उमेदवारांमध्ये ३ फुटांचे अंतर ठेवले जात असल्याची स्थिती प्रत्यक्ष केलेल्या पाहणीतून समोर आली. या कार्यालय परिसरात दलालांचा वावर मात्र दिसून आला. कार्यालयाच्या बाजूला असलेल्या झाडाखाली वाहनांमध्ये, तसेच इतर ठिकाणी दलाल मुक्तपणे फिरताना दिसून आले. यासंदर्भात बोलताना उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी सोमवारपासून परिसर दलालमुक्त करणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात प्रशासनाची कडक भूमिका असल्याचे ते म्हणाले.
कार्यालय परिसरात वाहनांचा गराडा
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरात वाहनांचा गराडा दिसून आला. यातील काही वाहनांमध्ये दलाल थांबत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. अनेक दिवसांपासून हे दलाल या कार्यालय परिसरात ठाण मांडून आहेत. अनेक दिवसांपासून ही स्थिती कायम आहे. या दलालांवर कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे.
उशीर केल्यास परत पाठविले जाणार
प्रत्येक उमेदवाराला चाचणीसाठी निश्चित वेळ दिलेला आहे. काही उमेदवार त्यांना ठरवून दिलेल्या वेळेत उपस्थित राहत नाहीत. नंतर ते चाचणीसाठी येतात. परिणामी, येथे गर्दी होते. यासाठी सोमवारपासून वेळेचे पालन न करणाऱ्या उमेदवारांना परत पाठविले जाणार असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात असून, प्रत्येकाला मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दलालांवरही सोमवारपासून कारवाई केली जाणार आहे.
-श्रीकृष्ण नखाते, आरटीओ, परभणी