शैक्षणिक प्रगती खुंटेल, शिक्षकांच्या बदली रद्द करा; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे नदीत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:31 PM2023-02-06T17:31:06+5:302023-02-06T17:31:54+5:30
विद्यार्थी आणि ग्रामस्थ्यांचे दूधना नदी पत्रात अर्ध जलसमाधी आंदोलन
मानवत (परभणी) : शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी तालुक्यातील इरळद येथील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज दूधना नदीपात्रात अर्धजल समाधी आंदोलन सुरु केले आहे. गटविकास आणि गटशिक्षणाधिकारी यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ठाम होते. बदली रद्द बाबत निर्णय झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा इशारा आंदोलकानी दिला आहे.
तालुक्यातील इरळद येथील जिल्ह्य परिषद शाळेत पहिली ते दहावी वर्गात 525 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षात या शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने महत्वपूर्ण बदल घडले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावल्याने शाळा नावारुपाला आली आहे. परंतु, नुकतेच 6 शिक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले. शिक्षक येथून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी ग्रामस्थांची भीती आहे. यामुळे सर्व शिक्षकांची बदली रद्द करावी , अशी मागणी करत ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी आज सकाळी सकाळी 11 वाजता दुधाना नदी पात्रात अर्धजल समाधी आंदोलन सुरु केले आहे. मागणी मान्यहोईपर्यंत आंदोलन सुरु च राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, ग्रामस्थांनी यापूर्वी देखील याच मागण्यांसाठी आंदोलन केले होते.
गटविकास अधिकारी आल्या पावली परतले
गटविकास अधिकारी स्वप्नील पवार, गटशिक्षणाधिकारी डी आर रनमाळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बदलीचा निर्णय रद्द झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा पवित्रा घेतल्याने गटविकास अधिकाऱ्याना आल्या पावली परत जावे लागले.