परभणीच्या पूर्णा शहरातील संचारबंदी शिथील
By Admin | Published: April 15, 2017 11:29 AM2017-04-15T11:29:26+5:302017-04-15T11:29:26+5:30
दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात लागू केलेली संचारबंदी शनिवारी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत शिथील केली आहे.
ऑनलाइन लोकमत
पूर्णा, दि. 15 - परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात लागू केलेली संचारबंदी शनिवारी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत शिथील केली आहे.
पूर्णा शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ८ च्या सुमारास ही मिरवणूक शिवाजी चौकात आली असता, या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर संतप्त जमावाने ५ ते ६ वाहने जाळली होती. शिवाय बाजारातील दुकानांसमोरील साहित्यही जाळण्यात आले होते.
या घटनेत एका पोलिस कर्मचा-यासह १० ते १५ जण जखमी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रारंभी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर रात्री १० नंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
रात्रभर शहरात तणावपूर्ण परिस्थिती होती. शनिवारी शहरात आणखी कडक बंदोबस्त लावण्यात आला असून, सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी शिथील करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सध्या पूर्णा शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.