ग्रामपंचायत निवडणूक निकालाची लागली उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:42+5:302021-01-18T04:15:42+5:30
मतदानानंतर निकालामध्ये दोन दिवसांचा अवधी मिळाल्याने गावागावांत सध्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. आपल्या गावात किती मतदान ...
मतदानानंतर निकालामध्ये दोन दिवसांचा अवधी मिळाल्याने गावागावांत सध्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. आपल्या गावात किती मतदान झाले, त्यामध्ये वाॅर्डातील मतदान किती होते, याची बेरीज सध्या उमेदवार करत आहेत. महिनाभरापासून कामाला लागलेल्या उमेदवारांना मतदानानंतरही १५ जानेवारीला रात्री निकालाच्या उत्सुकतेने शांत झोप लागली नसल्याचे चित्र आहे. आता प्रत्यक्ष आपल्या गावात मतदारांनी कोणाला कौल दिला, याची उत्कंठा उमेदवारांना आहे.
अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती
सोनपेठ तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहावयास मिळाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय मिळवून सरपंचपद मिळणे म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठेचे स्थान समजले जाते; परंतु आता निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्यांचेच स्वप्न रंगविलेले आहे. गावाचे कारभारी कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१२ टेबलांवर होणार मतमोजणी
सोनपेठ तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा निकाल १८ जानेवारी रोजी घोषित होणार आहे. यासाठी महसूल प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून यासाठी १२ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या १० फेऱ्या होणार आहेत. या सर्वांवर तहसीलदार आशीष कुमार बिरादार, नायब तहसीलदार ऐश्वर्या गिरी, साहेबराव घोडके, अनिल घनसावंत यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.