कोरोनाच्या काळातही सायबर क्राईम; बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 07:44 PM2020-03-31T19:44:26+5:302020-03-31T19:47:06+5:30
बँक खाते आणि एटीएम कार्ड बंद पडणार असल्याची केली बतावणी
परभणी : बँक खाते व डेबीट कार्ड बंद पडणार असल्याचे सांगून एका ग्राहकाला फोन करून त्याच्याकडून ओटीपी नंबर घेत त्याच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार २८ मार्च रोजी घडला असून, याबाबत सोमवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात एका मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी शहरातील गुजरी बाजार भागातील व्यावसायिक वासूदेव किशन गुंडाळे (६०) यांना ८९२७०५४९४० या मोबाईल धारकाने त्यांच्या मोबाईलवर फोन करून बँक आॅफ बडोदा या बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले़ तुमचे बँक खाते व डेबीट कार्ड बंद पडणार आहे, असे म्हणून त्याने गुंडाळे यांच्याकडून डेबीट कार्डचे शेवटचे ४ अंक व पाठीमागील सीव्हीसी नंबर एक वेळा आणि दोन वेळा ओटीपी फोनवरुन मागवून घेतला़त्यानंतर त्यांच्या परभणी येथील बँक आॅफ बडोदाच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये आॅनलाईनद्वारे परस्पर काढून घेतले़
ही बाब निदर्शनास आल्यानंतर गुंडाळे यांनी सोमवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ यावरुन ८९२७०५४९४० या मोबाईल धारकाविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोलीस करीत आहेत़