भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:26+5:302021-09-09T04:23:26+5:30
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर देण्याबाबतचा कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली ...
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर देण्याबाबतचा कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जात नाही. सरकारने हमी दर ठरवून ही त्या दराने शेतमालाची खरेदी होत नाही. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर किंवा सरकारने खरेदी केला तरी घोषित केलेल्या हमीदर पेक्षा कमी किमतीवर खरेदी केल्यास गुन्हा मानण्यात येईल, या दृष्टिकोनातून कठोर कायदे बनविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांना पत्र पाठवूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांत उपाध्यक्ष ॲड. सुभाषराव देशमुख, जिल्हाध्यक्ष नामदेव बुचाले, उपाध्यक्ष सुंदरराव शिंदे, डिगंबर काळे, जिल्हामंत्री बळवंत कौसडीकर, प्रकाश देशपांडे, मोहन आडे, भास्कर चौधरी, सुरेश नाईक, भानुदास शिंदे, डिगांबर लाड, लक्ष्मण सीताब, सुंदरराव शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. १० दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.