तीन जिल्ह्यातून वाहतूक होणा-या राहटी बंधा-यावरील पुलाचा धोका वाढला, वाहने जाताना पुलाला बसतात हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:30 PM2017-11-02T12:30:57+5:302017-11-02T12:36:09+5:30
कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर राहटी गावाजवळ असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पूलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे़
परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर राहटी गावाजवळ असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पूलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे़ पुलावरून वाहने नेताना पुलाला हादरे बसत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केल्याने ही बाब आणखीच गंभीर बनली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे़
कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग पुढे नांदेडकडे जातो़ या रस्त्यावर राहटी गावाजवळ पूर्णा नदीच्या बंधा-यावर हा पूल उभारला आहे़ १० खांबांवर हा पूल असून, अर्धा किमी अंतराचा आहे़ मागील एक वर्षापासून पुलाची दुरवस्था झाली आहे़ सध्या या दुरवस्थेत आणखीच भर पडली असून, पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला आहे़ विशेष म्हणजे हा पूल अरुंद आहे आणि त्यावरून दोन्ही बाजुंनी वाहतूक होते़ त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ हिंगोली, वाशीम आणि विदर्भात जाणारी वाहने याच पुलावरून धावतात़ त्याच प्रमाणे परभणीकडून वसमत, नांदेड, किनवटमार्गे आंध्रप्रदेशात जाण्यासाठीही या पुलाचाच वापर होतो़ राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज हजारो वाहने येथून धावतात़ प्रत्येक मिनिटाला ३ जड वाहने, ५ ते ७ आॅटो व इतर लहान वाहने आणि तेवढीच दुचाकी वाहने या रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले़ त्यावरून रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज बांधता येतो़
शेकडो वाहनांची दिवस-रात्र वाहतूक सुरू असल्याने पुलाची दुरवस्था वाढत चालली आहे़ या पुलावरील रस्त्यावर गिट्टी शिल्लक राहिली नाही़ पुलाच्या छतावरील सिमेंट जागोजागी उघडे पडले आहे़ तसेच जड वाहन पुलावरून गेल्यानंतर हादरे बसत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे़ मागील सहा महिन्यांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ वाहने हळू चालवावी लागत आहेत़ तसेच कठडे तुटल्यामुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन नदी पात्रात पडण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे या पुलाची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पार्डीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्याची भेट झाली नाही़ त्यामुळे बांधकाम विभागाची बाजू समजू शकली नाही़
सतत वाढतोय पुलाचा धोका
नदीपात्रापासून सुमारे ३० फुट उंचावर हा पूल आहे़ या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडल्याने पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे़ विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला असलेले लोखंडी कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना पुलावरून वाहतूक करताना आणखी धोका वाढला आहे़ काही ठिकाणी तर तुटलेल्या कठड्याच्या जागी बांबू लावून तात्पुरती डागडुजी केली आहे़ मात्र वाहनांच्या धडकेने हे बांबू कितपत टिकाव धरतात? असा प्रश्न निर्माण होत आहे़
डागडुजीसाठी कारवाईची आवश्यकता
राहटी बंधा-यावरील पुलाची दुरवस्था झाल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़
समितीनेही दिला होता अहवाल
मध्यंतरी जिल्ह्यातील पुलांची पाहणी करण्यासाठी मुंबई येथून एक समिती जिल्ह्यात येऊन गेली़ या समितीने राहटी पुलाबरोबरच परभणी येथील उड्डाणपुल, पाथरी तालुक्यात गोदावरी नदीवरील ढालेगावचा पूल या पुलांची पाहणी केली होती़ त्यावेळी या समितीनेही राहटीचा पूल धोकादायक असल्याची माहिती समितीतील अधिका-यांनी त्यावेळी ‘लोकमत’ला दिली होती़ त्यामुळे राहटी पुलाच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ वाहनधारकही हैराण झाले आहेत.