शिष्यवृत्ती परीक्षेत माळीवाड्याच्या झेडपी शाळेचा डंका; राज्यात पहिल्या दहात तीन विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:56 PM2023-07-21T13:56:39+5:302023-07-21T13:58:14+5:30
परभणी जिल्ह्यात प्रथम, द्वितीय, तृतीय माळीवाडा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी) : फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील जिप प्राथमिक शाळा माळीवाडयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेचे 21 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील तीन विद्यार्थी आहेत. तसेच शाळेचे 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
राज्याच्या गुणवत्ता यादीत शाळेचे 3 विद्यार्थी चमकले आहेत. यात पार्थ पंकज बिरादार (272 गुणांसह- 7व्या स्थानी), शरयू कैलास जाधव (270 गुणासह- 8व्या स्थानी) आणि कनुप्रिया अभयसिंग नाईक (268 गुणांसह - 9व्या स्थानी) यांचा समावेश आहे. यासह या माळीवाडा शाळेच्या विद्यार्थ्याने परभणी जिल्ह्यातील पहिल्या तिन्ही क्रमांकावर नाव कोरलं आहे.
परभणी जिल्ह्याचे नाव राज्ययादीत आल्याने तिन्ही शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक ईखे, शाळा व्यावस्थापन समितीचे शिक्षक विस्तार अधिकारी मुकेश राठोड आणि गटशिक्षणाधिकारी गीते यांनी स्वागत केले आहे.