'डर है किस बात का..' बाईकवरील रील ठरली अखेरची; चार मित्रांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:01 PM2023-01-27T13:01:11+5:302023-01-27T13:01:43+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी जाताना झाला भीषण अपघात
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी एकाच बाईकवर जाणाऱ्या चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुचाकीला भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी ( दि. २६) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या दोन विध्यार्थांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती स्थिर आहे.
पाथरी तालुक्यातील कानसूर फाटा येथे एक खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये डाकूपिंप्री येथील चार विद्यार्थी 9 व्या वर्गात शिक्षण घेत होते. गुरुवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभासाठी चौघे एकाच बाईकवरून सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातून निघाले. शाळेपासून अगदी काही अंतरावरच दुचाकीवरील विद्यार्थी मोबाईलमध्ये व्हिडिओ रील बनवत होते. यावेळी एक व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद झाला. मात्र काही वेळातच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
यात चौघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. एका विद्यार्थ्याचा अक्षरशः हात तुटून पडला होता. चौघांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथे आणण्यात आले. यातील स्वप्नी चव्हाण या विद्यार्थ्यास अधिक उपचारासाठी लातूरला रवाना करण्यात आले. तर इतर तिघांवर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते. दरम्यान, यातील शंतनू कांचन सोनवणे याचा गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी स्वप्निल पवार याचा आज सकाळी सहाच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
डर है किस बात का...
बाईक चालवत असताना बनवलेली चौघांची रील शेवटची ठरली. यात चारही मित्र खूप उत्साही दिसत होते. रीलसाठी त्यांनी डर है किस बात का, जब हम है तेरे साथ असे गाणे वापरले होते. हा व्हिडीओ व्हायरल होत असून हळहळ व्यक्त होत आहे.