परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:07 PM2022-01-10T13:07:01+5:302022-01-10T13:08:34+5:30
corona virus : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इतर व्यवहारांवरही आणले निर्बंध
परभणी : कोरोना रुग्ण (corona virus ) वाढत असल्याने राज्य शासनाने दिवसाची जमावबंदी लागू केली आहे. याच आदेशातनुसार जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी १० जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात दिवसाची जमावबंदी लागू केली आहे. तसेच इतर काही बाबींवरही निर्बंध घातले आहेत.
जिल्ह्यातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश १० जानेवारी रोजी काढले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी ११ जानेवारीपासून जिल्ह्यात केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभागप्रमुखांच्या परवानगी शिवाय कार्यालय प्रवेश बंद
जिल्हाधिकारी यांनी शासकीय कार्यालयांसाठीही निर्बंध जाहीर केले आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीशिवाय नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई राहणार आहे. तसेच प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चा करण्यासाठी व्हीसीची सुविधा कार्यान्वित करावी, शासकीय बैठका ऑनलाइन स्वरूपात घ्याव्यात, कार्यालयाच्या वेळेत बदल करून शक्य झाल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ ही सुविधा द्यावी, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर मशीन ठेवावी, अशा सूचना दिल्या आहेत.
खाजगी कार्यालयांना काय सूचना?
खाजगी कार्यालयांच्या व्यवस्थापनाने ‘वर्क फ्रॉम होम’ला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. ५० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थिती राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालयीन वेळा २४ तास करून कर्मचाऱ्यांच्या ड्युटी कालावधीमध्ये आवश्यक ते बदल करावेत.
सलून, व्यायामशाळेत ५० टक्के उपस्थिती
सलून दुकाने आणि व्यायाम शाळांवरही निर्बंध घातले आहेत. त्यात या दोन्ही ठिकाणी ५० टक्के क्षमतेसह उपस्थिती राहण्यास मुभा दिली आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत सलून दुकाने बंद असतील. या दुकानांमध्ये केशकर्तनाशिवाय इतर प्रकारच्या कामांना मनाई आहे. व्यायाम शाळेतही ५० टक्केसह उपस्थिती बंधनकारक केली आहे. केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच व्यायामशाळेत प्रवेश द्यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.