दिवसा घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी ताब्यात; परभणी जिल्ह्यातील बारा घरफोडीची कबुली
By राजन मगरुळकर | Updated: October 11, 2024 18:11 IST2024-10-11T18:11:32+5:302024-10-11T18:11:45+5:30
नगर, बीड, परभणी जिल्ह्यातील घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

दिवसा घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी ताब्यात; परभणी जिल्ह्यातील बारा घरफोडीची कबुली
परभणी : दिवसा घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी परभणी पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतली. यामध्ये परभणी जिल्ह्यातील बारा घरफोडी या टोळीने केल्याचे कबूल केले. यात आरोपीकडून सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय अहिल्यानगर, बीड जिल्ह्यात देखील घरफोडीचे गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात काही महिन्यात झालेल्या घरफोडी गुन्ह्यांचे आरोपी शोधण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा शाखा पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना दिल्या. स्थागुशाने पथक तयार करून शोध घेतला. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून दिनेश अंगद भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) याने साथीदारांसह परभणी जिल्ह्यात दिवसा घरफोडी केल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पथकाने मंगळवारी दिनेश अंगद भोसले यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने साथीदारांसह दुचाकीवर येऊन परभणीत १२ घरफोडी केल्याचे सांगितले. चोरीतील त्याच्या हिस्साचा माल पाटोद्यात सोनाराला विकल्याचे सांगितले. नंतर सोनारास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीचा माल घेतल्याचे सांगितले.
सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सोन्याचे दागिने व लगड मिळून ७० ग्रॅम सोने जप्त केले. आरोपी दिनेश भोसले यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रक्कम जप्त केली. या आरोपीकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये ताडकळस, नवा मोंढा, दैठणा, गंगाखेड, पूर्णा, पालम, चुडावा, मानवत येथील एकूण बारा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी ताडकळस पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उर्वरित मुद्देमाल व पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेत आहेत. अहिल्यानगर, बीड, परभणी जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे आरोपीविरुद्ध दाखल असून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या पथकाने केली कारवाई
कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, राजू मुत्येपोड, गजानन मोरे, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, काठेवाड, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, कर्मचारी विलास सातपुते, रवी जाधव, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, हुसेन, राहुल परसोडे, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, मधुकर ढवळे, नीलेश परसोडे, हनुमान ढगे, रामदेव डुबे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, शेख रफियोद्दीन, भारत तावरे, रामकिशन काळे, दत्ता जाधव, गणेश कौटकर यांनी केली.