सायरन वाजवत पोलिसांची दिवसाही गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:46+5:302020-12-29T04:14:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : रात्री- अपरात्री घडणाऱ्या अवैध घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून रात्रीची गस्त घातली जाते. मात्र, ...

Daytime police patrol sounding sirens | सायरन वाजवत पोलिसांची दिवसाही गस्त

सायरन वाजवत पोलिसांची दिवसाही गस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : रात्री- अपरात्री घडणाऱ्या अवैध घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून रात्रीची गस्त घातली जाते. मात्र, परभणी शहरात आता दिवसाही पोलिसांनी गस्त सुरू केली असून, विविध घटनांसह वाहतुकीच्या समस्येवरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यात सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच वाहतुकीच्या समस्या, अपघात या घटनांसह अवैध धंद्यांमध्येही वाढ झाली आहे. शहराच्या हद्दीत अवैध धंद्यांबरोबरच वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. दररोज कुठे ना कुठे ही समस्या निर्माण होत असते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यावर उपाय शोधला गेला नाही. याच दरम्यान पोलीस प्रशासनाला अद्ययावत अशा नवीन चारचाकी गाड्या मिळाल्या असून, या वाहनांचा वापर दिवसाची गस्त घालण्यासाठी केला जात आहे. ही वाहने दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत मुख्य रस्त्यांवर फिरवली जातात. यादरम्यान रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना रस्त्याच्या बाजूला करणे, कुठे गैरप्रकार सुरू असेल तर तातडीने हस्तक्षेप करुन त्यावर नियंत्रण मिळवणे आदी कामे पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत. दिवसभर सायरन वाजवत पोलिसांची वाहने रस्त्यावरुन फिरत असून, या गस्तीमुळे शहरातील वाहतुकीच्या समस्येबरोबरच अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी गत महिन्यापासून कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये अवैध गुटखा पकडण्याची मोहीमच सुरू केली होती. त्यामुळे मध्यंतरी जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मटका, जुगार आणि रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Daytime police patrol sounding sirens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.