पूर्णा येथे धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रवाश्याचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:02 PM2018-02-06T17:02:02+5:302018-02-06T17:05:44+5:30
मराठवाडा एक्सप्रेसने परभणी ते नांदेड प्रवासादरम्यान पूर्णा स्थानकाजवळ एका प्रवाश्याचा रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना काल रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली.
पूर्णा ( परभणी) : मराठवाडा एक्सप्रेसने परभणी ते नांदेड प्रवासादरम्यान पूर्णा स्थानकाजवळ एका प्रवाश्याचा रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना काल रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा (जी. हिंगोली ) तालुक्यातील अशोक किसनराव कढाळे (३५) हा सोमवारी रात्री मराठवाडा एक्सप्रेस ने परभणीहून नांदेडकडे जात होता. रात्री १० वाजेच्या दरम्यान रेल्वे पूर्णा स्थानकपासून पुढे नांदेडकडे निघाली. यावेळी अचानक धावत्या रेल्वेतून अशोक खाली पडला. यात त्याच्या डाव्या पायाला व डोक्याच्या मागच्या बाजूस जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अशोकच्या खिशात आढळून आलेल्या डायरीवरून त्यांनी अशोकच्या नातेवाईकांशी संपर्क केला. यातून अशोकची ओळख पटली. आज अशोकचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास स.पो.उप.नि एकबाल सरवर व पो.शि. सागर पेठे हे करत आहेत.