झोपेतच मृत्यूचा घाला; ट्रॅक्टर घरावर उलटल्याने उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 09:06 AM2021-11-30T09:06:47+5:302021-11-30T09:11:57+5:30
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील पहाटेची घटना
-विठ्ठल भिसे
पाथरी - साखर कारखाण्याकडे ऊस घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित व्होउन रस्त्याच्या बाजूच्या घरावर उलटल्याची घटना आज पहाटे 5 वाजता तालुक्यातील बाभळगाव येथे घडली. यात उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून घरातील 55 वर्षीय महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. तर एक 8 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
बाभळगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस माजलगाव येथील खाजगी साखर कारखान्याला गळपास जात होता . आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास शेतातून उसाची ट्राली भरून एक ट्रॅक्टर बाभळगाव येथून जात होता. यावेळी ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या घरावर उलटला.
यावेळी घरात पलंगावर झोपलेल्या पारुबाई रंगनाथ पवार (55) आणि त्यांची नात शिवानी संजय जाधव ( 8 ) या दोघी ऊसाच्या ढिगा खाली गाढल्या गेल्या. अचानक अंगावर कोसळलेल्या उसाच्या मोळ्यांने पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या आजी नातीला काहीच हालचाल करता आली नाही.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. मात्र, पारुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची नात शिवानी जाधव गंभीर जखमी आढळून आली. जखमी शिवानीला तातडीने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत घरात पलंगाच्या बाजूला झोपलेली पुष्पा पवार ही महिला सुदैवाने बचावली आहे.