झुल्यातून पडून युवकाचा मृत्यू : परभणीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:34 AM2018-02-17T00:34:01+5:302018-02-17T00:35:10+5:30
हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसात उभारण्यात आलेल्या गोलाकार स्लॅम्बो झुल्यातून पडून एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसात उभारण्यात आलेल्या गोलाकार स्लॅम्बो झुल्यातून पडून एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील धाररोडवरील आनंदनगरातील शेख सोहेल शेख बाबू (१८) हा आपल्या मित्रांसमवेत गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरुन पैसे घेऊन ऊरुसात गेला होता. त्यानंतर मित्रांसमवेत १०.३० वाजेच्या सुमारास ऊरूसात गोलाकार असलेल्या स्लॅम्बो झुल्यात बसला. झुला सुरु झाल्यानंतर काही वेळात तो पडला.
सोहेलच्या डोक्याला व मानेला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ११ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात बाबुमियाँ शेख युसूफ यांच्या तक्रारीवरुन झुला चालक पिंटू वासुदेव बॅनर्जी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय महेश ठाकूर हे करीत आहेत.