कर्ज आणि नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याची राहत्या घरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:46 PM2021-12-13T12:46:29+5:302021-12-13T12:46:45+5:30
बँकेकडून शेतकऱ्याने साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते
पाथरी (परभणी ) : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले साडेतीन लाख रुपये कर्ज आणि नापिकीला कंटाळून पाथरी तालुक्यातील डोंगरंगाव येथील एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान 13 डिसेंबर रोजी पहाटे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी नामदेव शिवाजी फासाटे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नामदेव मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या वर्षी सुद्धा नाकिपीमुळे शेतातून उत्पन्न नव्हते. त्याचबरोबर नामदेवने पाथरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या साडे तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाचा डोंगर वाढत होता.
नापिकी आणि कर्ज यामुळे नामदेव पूर्णतः खचले होते. यातच रविवारी सायंकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरी वायरने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजी फासाटे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.