मुळी बंधाऱ्याला पक्के दरवाजे बसविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:33+5:302021-09-25T04:17:33+5:30
परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे स्वयंचलित दरवाजे मागील अनेक वर्षांपासून खराब झाल्याने या भागातील सिंचनाचा प्रश्न लक्षात घेता ...
परभणी : गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे स्वयंचलित दरवाजे मागील अनेक वर्षांपासून खराब झाल्याने या भागातील सिंचनाचा प्रश्न लक्षात घेता बंधाऱ्यास पक्के दरवाजे बसविण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली माधवराव भोसले, श्रीकांत भोसले, दशरथराव सूर्यवंशी, भरत घनदाट आदींनी मुळी बंधाऱ्याचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडला. गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्याचे स्वयंचलित दरवाजे मागील काही वर्षांपासून नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होत नाही. सुमारे १ हजार ७५० हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास अडचण निर्माण होत आहे. या बंधाऱ्याला दरवाजे बसविल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच अनेक कुटुंबीयांचे स्थलांतर होईल तेव्हा बंधाऱ्याचे काम हाती घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांना देण्यात आले. जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, राकाँचे तालुकाध्यक्ष माधवराव भोसले यांनी दरवाजे नसल्याने निर्माण झालेली परिस्थिती पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी याच ठिकाणी मुळी बंधाऱ्यास पक्के दरवाजे बसवून गंगाखेडवासीयांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे मुळी बंधाऱ्याचा मागील अनेक वर्षांपासूनचा रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे. या प्रसंगी भारत जाधव, संतोषराव जाधव, राजाभाऊ घोगरे, माणिक ढोले, बालासाहेब नेमाणे, रमेश जाधव, नागनाथराव निरस, गणेश निरस, दिलीप भोसले, तुकाराम धायगुडे, कुलदीप जाधव, नंदकुमार भालके आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.